एक कविता माझ्या मुलीसाठी: माझी मुलगी: संदीप खरे

माझी मुलगी : संदीप खरे

सकाळचे 9.15. ती अजूनही पांघरुणात लोळते आहे. तिनं खरं तर आता उठायला हवं आहे. “उरलेला होमवर्क उद्या नक्की पूर्ण करते’ असं लाडात येऊन माझ्या मांडीवर बसून म्हणत तिनं कालच मला नेहमीसारखंच खिशात टाकलं आहे. पण आजही तो पूर्ण होईल याची काहीही चिन्हं तिच्या चिमुकल्या निरागस आणि झोपेचं मनमुराद सुख अनुभवणाऱ्या चेहऱ्यावर दिसत नाहीयेत. तिच्या आवडीचं मऊ-मऊ फरचं पांघरुण ती उशीर होईल तसतसं अधिकच गुंडाळून घेते आहे. त्या फरच्या पांघरुणात ती स्वतःच आता एका सशासारखी दिसते आहे. तिला उठवण्याची हिंमत आता माझ्यात नाही! (तिची आई येऊन पटकन हे काम करून जाते. तीदेखील तिच्या वडिलांना लहानपणी अशीच दिसत असणार. म्हणूनच या सशीला त्या सशीला जागं करणं तुलनेनं सोपं जात असणार!)

उठल्यानंतर तिच्या स्पीडनं ती आता आन्हिकं उरकण्याच्या मागे लागली आहे. परंतु अधूनमधून तिचं काय चाललं आहे याचा आढावा घेत राहणं आवश्‍यक आहे. कारण दात घासत असताना बाथरूमच्या खिडकीबाहेर तिची तंद्री लागली तर दात घासायला सुमारे 25 मिनिटं लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तिला हलतं ठेवण्याच्या कामी सहसा माझी नेमणूक न करता तिची आई ही कामगिरी शक्‍यतो स्वतःवरच घेते. कारण तिला आठवण करायला मी गेलो आणि ती एखादं कॉमिक्‍स वगैरे वाचत असली तर मीही तिथंच तिच्याबरोबर कॉमिक्‍स वाचत राहणं अगदीच शक्‍य असतं!

स्लो मोशनमध्ये दात घासणं, दूध पिणं, आंघोळ, दप्तर भरणं, पेन्सिलींना टोक करणं या क्रिया चालू असतानाच मध्येच एकदम “ए आ।।य़ुडी’ किंवा “ए बा।।बुली’ म्हणत ती मला किंवा तिच्या आईच्या गळ्यात हात टाकून बिलगत असते. (माझं तर सोडून द्या, पण अशा वेळी मातोश्रींच्या ओरडण्याची धारही बरीच कमी होऊन जाते.) वयाच्या सहाव्या वर्षापासून हे हमखास यशस्वी टेक्‍निक तिनं कुणाकडून शिकून घेतले आहे देव जाणे! आता शाळेत जाण्यापूर्वी जेवणं हा महत्त्वाचा पण अतिशय जिकिरीचा टप्पा सामोरा येतो. यात जेवण सुरू करण्यापूर्वी एकीकडे वाचायला एखादं पुस्तक शोधणं व ते घेऊन ताटावर बसूनही जेवायला सुरवातच न करणं, या क्रियेचा हमखास अंतर्भाव होतो. लक्ष न दिल्यास हा कालावधी अमर्यादित काळापर्यंत वाढू शकतो! पुस्तक काढून घेतल्यावर ओठांचा चंबू करून नाखुषी दर्शवणं या क्रियेकडे लक्ष न देता “पानात काय काय वाढलंय… ते कसं पोटात जायला हवं, त्यानं शक्ती व बुद्धी कशी वाढते’ याचं वर्णन हा जेवणक्रियेचा अपरिहार्य भाग असतो. रोज रोज हे ऐकल्यानं त्यातील नावीन्याचा भाग तिच्या दृष्टीनं बराच कमी झालेला आहे. आता भोजनाला सुरवात करण्यापूर्वी “मांडवली’चा भाग सुरू होतो. “आई, दोन पोळ्या?’ किंवा “भाजी किती वाढल्येयस?’ किंवा “एवढा भात?’ या वाटाघाटींना सुरवात होते. दुकानदार साडीची किंमत आधीच वाढवून मग त्यावर सूट दिल्यासारखं करतो, त्याप्रमाणेच तिची आई आधीच जास्त भात वाढून नंतर कमी करून भात “खपविण्यात’ यशस्वी होते! (एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीशी यशस्वी “डील’ करू शकते. दोघीही कुठल्याही वयाच्या असल्या तरी!) जेवण सुरू होतं. जेवताना तिचा चेहरा मध्येच दुःखी होतो. काल रात्री मी तिला एका गरीब मुलाची गोष्ट वाचून दाखवलेली असते. जेवायला मिळत नाही म्हणून तो भुकेपोटी एका दुकानातून पाव चोरतो, तुरुंगात जातो.. अशा आशयाची! ते ऐकताना कालच ती थोडी रडवेली झालेली होती. आज ते आठवून पुन्हा तिच्या डोळ्यांत आलेलं पाणी “जेन्युईन’ असतं! मग मी विषय बदलून तिच्या जेवणाला “पुश’ देतो. दोन दिवसांपूर्वी पाहिलेल्या “हॅरी पॉटर’च्या सिनेमाविषयी बोलतो. क्षणात तिच्या चेहऱ्यावर इंद्रधनुष्य पसरतं. “गप्पा नकोयत… शाळेला उशीर होतोय’ हा संदेश कानावर आल्यानंतर सुमारे “दहा सेकंद’ इतकं प्रदीर्घ काळ मौन पाळून ती उत्साहानं शाळेतल्या काही गमती मला सांगू लागते. यानंतर शाळेतून आल्यानंतर तिला “पोगो’वर कुठला प्रोग्रॅम पाहायचा आहे किंवा आज कुठल्या प्रकारचे खेळ खेळायचे आहेत, याची साद्यंत चर्चा होईस्तोवर जेवण समारंभ एकदाचा संपतो. युनिफॉर्म घालताना कसा कुणास ठाऊक, पण अर्धवट राहिलेला होमवर्क तिला आठवतो आणि अतिशय करुण चेहरा करून टीचर तिला आज ओरडू शकतात ही व्यथा ती मला सांगते. त्या बाबतीत एक बाप म्हणून तिला मॅडमसाठी “एक्‍स्यूज’ची चिठ्ठी देणं हे माझं कर्तव्य आहे, असा काहीसा आशय तिच्या मनात असतो. कधी तरी मी देतोही; पण आज अगदी कठोर होत मी तिला स्पष्ट नकार देतो. “ओरडू देत टीचर, निदान आज तरी पूर्ण करशील’ असं ओरडतोही. (पण फार ओरडणं शक्‍य नसतं कारण याच बाबतीतली माझी लहानपणची “पूर्वपुण्याई’ मला ओरडण्यासाठी “नैतिक बळ’ देत नसते.) खिन्न आणि पश्‍चातापदग्ध अवस्थेत सुमारे दीड मिनिट वावरल्यानंतर अचानक ती मला दप्तरातून तिनं काल शाळेत केलेलं कागदाचं फुलपाखरू दाखवते. आता तिचा मूड त्या फुलपाखराइतकाच रंगीबेरंगी झालेला असतो. बूट घालून झाल्यानंतर “सॉक्‍स बदलायला हवेत’ हे आठवणं, त्यावर मायलेकींच्या काही वाटाघाटी, मग बूट काढून नवे सॉक्‍स घालणं, पुन्हा बूट घालणं इत्यादी क्रिया पार पडून अखेर शाळेला जाण्यासाठी ती दरवाजाशी पोचते. अचानक मागे वळून माझ्या अंगावर झेपावत “बबुली बबुली’ म्हणत पाप्या घेत मला “आलेच हं पटकन शाळेत जाऊन’ असा धीर देते. “तोपर्यंत तुझं लिहिण्याचं वगैरे काम करून ठेव’ असं बजावते आणि शाळेत पोचवणाऱ्या व्हॅनमध्ये जाऊन बसते.

घर एकदम शांत होतं… “चला आता जरा निवांत लिहिता येईल’ असं म्हणत मी माझा अर्धवट राहिलेला लेख लिहायला घेतो… पण का कुणास ठाऊक “निवांत’ नाही वाटत…. “रिकामं रिकामं’ वाटतं!

एक कविता माझ्या मुलीसाठी

समजूत
ही माझी छोकरी
पाकोळीसारखी फ…ड…फ…ड…ते…
माझ्या हृदया-आत.
चाफ्याच्या फुलांचे
तिचे सुगंधी इवले हात
हृदयभर फिरतात
हृदय सावरतात
माझ्या सावलीतले
तिचे-माझे दिवस
भुरूभुरू उडून चालल्याच्या
जाणिवेची कसर
काळीज कुरतडत राहते माझं.
तिला थोपटत थोपटत
सांगू लागतो एक गोष्ट
…सासर नसलेल्या जगाची.

father daughter marathi poem

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *