नाही जमणार… लेकाचा फोन. सातासमुद्रापल्याड गेलेला तो.

सेल्फीश….

नाही जमणार…
लेकाचा फोन.
सातासमुद्रापल्याड गेलेला तो.
बहुधा कायमचाच.
या गणपतीतही येता नाही येणार,असं म्हणाला.
माई थोड्या खट्टू झाल्या खर्या..
क्षणभरच.
विपश्यनेचा हा एक फायदा.
पूर्वीसारखं कशातही गुंतून पडत नाहीत त्या.
नाही तर नाही…
अंतर पडलंय खरं..
प्रेम कमी नाही झालं , पण…
ओढ मात्र कमी झालीय.
पूर्वी नातवासाठी जीव तुटायचा माईंचा.
आता नाही.
दोन दिवस येतात मंडळी.
तेव्हाचा प्रत्येक क्षण उपभोगायचा.
‘आजी’पण मस्त एन्जाॅय करायचं.
नंतर…
काॅलनीत खूप नातवंडं आहेत माईंची.
वेळ कसा मजेत जातो.

आबांचं हे एक बरंय.
धबधब्याखालचा दगड असल्यासारखं आहे त्यांचं.
चिंब पाउस, नाहीतर रणरणतं ऊन.
दगडाला सगळं सारखंच.
ते कुठलाही ओलावा मनाला लावून घेत नाहीत.
ते आपल्याच विश्वात मशगुल.
अर्थात या विश्वात माईच असायच्या फक्त.
यावेळी माईंनी ठरवलं.
थोडं सेल्फीश व्हायचं.
दीड दिवसाचा तर गणपती आपल्या घरचा.
बाप्पांना निरोप दिल्यानंतर, चार दिवस मस्त गोव्याला जाउन यायचं.
आपण दोघंच.
अगदी त्या व्होडाफोनच्या जाहिरातीतल्या, म्हातारा म्हातारीसारखं.
धडधाकट आहोत तोवर ,असं मस्त फिरायचं.
गाडीचा गिअर बदलायचाच आता.
गणपती आले अन् गेले.
माई आबांची ट्रीपची गडबड.
बॅगा भरून तयार.
सकाळी सातचीच फ्लाईट .
साडेपाच वाजताच कॅबवाला आला.
लाॅक लावण्याआधी, माईंनी आबांबरोबर मस्त ‘सेल्फी’ काढला.
कधी नव्हे ते आबाही मस्त हसले.
दिल में फ्रेम करून ठेवावा, असा मस्त फोटो आला.
लाॅक करून निघणार तेवढ्यात…
अभयचा फोन.
….आई , अगं आम्ही येतोय .
हिची आई खूप मागे लागलीय.
म्हणलं जाऊ यात .
तुझंही चाललंच होतं ये ये म्हणून…
माईंची चलबिचल.
..काय करावं ?
कॅन्सल करावा का गोवा?
मायक्रोसेकंदात माईंनी निर्णय घेतला.
…अभू.
आमचा प्रोग्रॅम ठरलाय.
कॅन्सल नाही करता येणार.
यावेळी जावईबापू, सासुरवास एन्जाॅय करा..
काहीतरी ठरवल्यासारखं माईंनी लाॅक लावलं.
अर्धा तास ….
आणि माई आबा हवेत तरंगत गोव्याच्या दिशेने.
हा ‘सेल्फीश’ मोड माईंना जाम आवडला.
आज में ऊपर…
आसमाँ नीचे…
हॅपी जर्नी माई आबा.

……..कौस्तुभ केळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *